राजस्थान : राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. लग्नाच्या नावाखाली नवरदेव फसवणूकीचा बळी ठरला. लग्नाच्या 4 दिवसानंतर वधू आपल्या माहेरी गेली तेव्हा तिने नवरदेवाने तिला दिलेल्या नवीन मोबाइलद्वारे कॉल करून त्याला सांगितले की तुझी फसवणूक झाली आहे, मी लग्नात पोळ्या बनवायला आले होते, पण मला धमकी देऊन जबरदस्तीने तुझ्याबरोबर लग्न लावून दिले.
उम्मेद सिंह नावाच्या तरुणाच्या घरी 20 दिवसांपूर्वी गंगा सिंह नावाचे गृहस्थ स्थळ घेऊन आले होते. त्यांच्यासोबत जोधपूरच्या नागौरमधील काही लोक होते. त्यावेळी ‘आपल्या नात्यात एक मुलगी आहे. तिच्याशी तुमचं लग्न जुळवून देतो,’ असं गंगा सिंहने उम्मेद यांना सांगितलं. त्यानंतर उम्मेद सिंह त्यांचे मामा आणि भावासह मुलगी बघायला गेले. त्यांनी मुलीच्या हातावर 500 रुपये ठेवून लग्न पक्कं केलं. यावेळी गंगा सिंहने मुलीच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने लग्नाचा सर्व खर्च तुम्हालाच करावा लागेल. तसेच मुलीच्या वडिलांना साडे तीन लाख रुपये द्यावे लागतील, असं उम्मेद सिंह यांना सांगितलं.
त्यानंतर 7 डिसेंबर रोजी उम्मेद सिंहने नातेवाईकांसह नागौरला जाऊन मध्यस्थी करणाऱ्या गंगा सिंहकडे दोन लाख रुपये दिले. गंगा सिंहने उम्मेद यांना 11 डिसेंबर रोजी नागौरला वरात घेऊन यायला सांगितलं. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी संध्याकाळी ते वरात घेऊन नागौरला पोहोचले. तेव्हा गंगा सिंह यांनी थोडावेळ थांबा मुलीच्या घरात एकाचा मृत्यू झाला आहे, असं सांगत ही वरात स्वत:च्या गावी मांगलोदला नेली. मांगलोदला वरात आल्यावर गंगा सिंहने उरलेले एक लाख 50 हजार रुपये घेतले आणि त्यांचं लग्न लावून दिलं.
लग्नाच्या दोन दिवसानंतर गंगा सिंह आला आणि तो नवरीला माहेरी घेऊन गेला. त्यानंतर पुन्हा दोन दिवसानंतर तिला सासरी सोडलं. ती सासरी आली तेव्हा उम्मेद सिंहने तिला मोबाईल भेट म्हणून दिला. 19 डिसेंबर रोजी त्याच मोबाईलवरून कांताने उम्मेद सिंहला फोन लावला आणि सारी हकीकत सांगितली. “गंगा सिंहने तुमची फसवणूक केली आहे. मला धमकावून लग्नाच्या मंडपात बसवून माझं जबरदस्तीने लग्न लावून दिलं. आता मला भिलवाड्याला त्यांनी सोडलं आहे. मी नागौरला सात दिवसासाठी लग्नांमध्ये स्वयंपाक बनवायला आले होते. 1 हजार रुपये रोजंदारीवर लग्नात पोळ्या लाटण्याचं काम करण्यासाठी मला बोलावण्यात आलं होतं. पण गंगा सिंहने मला धमकावून तुमच्याशी लग्न करायला लावलं. त्यामुळे मी जीवाच्या भीतीने तुमच्याशी लग्न केलं,” असं तिने उम्मेद सिंहला सांगितलं.
सर्व हकीकत ऐकल्यावर उम्मेद सिंह यांच्या पायाखालची जमीन सरकली. या लग्नासाठी त्यांचे 10 लाख रुपये खर्च झाला. पैसाही गेला आणि बायकोही, अशी त्यांची अवस्था झाली. आपली फसवणूक झाल्याचं कळल्याबरोबर त्यांनी थेट मतोडा पोलीस ठाण्यात जाऊन गंगा सिंहच्या विरोधात भादंवि कलम 420 आणि 406 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. मुलगी बघायला गेलो तेव्हा त्यांना दुसरी मुलगी दाखवण्यात आली होती. पण लग्न मात्र दुसऱ्याच मुलीशी लावून दिलं. दुसऱ्या मुलीशी लग्न लावून दिलं जात असतानाही लग्न होत असल्याने मी शांत राहिलो, असं उम्मेद सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.