नवी दिल्ली : देशात गुंतवणूकदार वाढावेत आणि देशातील उद्यागांना उभारी मिळावी म्हणून मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने देशातील 10 क्षेत्रातील उद्योगांना पीएलआय देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरकारने उद्योगांसाठी 2 लाख कोटींचे नवे पॅकेज जाहीर केले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय जाहीर करताना ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण 10 सेक्टरमधील उद्योगांना पीएलआय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. पीएलआय योजनेचा लाभ रेफ्रिजीरेटर, वाशिंग मशीन, औषधी, वाहन, दूरसंचार, कपडे, खाद्यपदार्थांचे उत्पादन, मोबाईल फोनची बॅटरी अशा उद्योगांत गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना मिळेल.निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, या योजनेमुळे वेगवेगळ्या उत्पादनांच्या निर्मात्यांना प्रोत्साहन देईल. देशाला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाण्यास या योजनेचा लाभ होईल. या योजनेमुळे देशात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या उद्योगांना या योजनेचा चांगला लाभ मिळेल.
सीतारामन यांनी सांगितल्या प्रमाणे
- इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान उत्पादन उद्योग- 5 हजार कोटी
- वाहन तसेच वाहनांचे सुटे भाग बनवणारे उद्योग- 57 हजार 42 कोटी
- औषधी- 15 हजार कोटी
- दुरसंचार आणि नेटवर्कींग संबंधित उत्पादन घेणारे उद्योग- 12 हजार 195 कोटी
- वस्त्रोद्योग- 10 हजार 683 कोटी
- खाद्य उत्पादन-10 हजार 900 कोटी
- फ्रिज, वाशिंग मशीन- 6 हजार 238 अशा स्वरुपाचे पॅकेज पीएलआयच्या माध्यमातून मिळेल.
Cabinet approves PLI scheme for 10 key sectors for enhancing India’s manufacturing capabilities and enhancing exports; scheme will make Indian manufacturers globally competitive, attract investment and enhance exports pic.twitter.com/MuaX1SZ0TC
— K.S. Dhatwalia (@DG_PIB) November 11, 2020
पीएलआय म्हणजे, देशातली उद्योगांच्या उत्पादनांची विक्री जास्त व्हावी म्हणून सरकारकडून प्रोत्साहनपर आर्थिक मदत दिली जाते. विदेशी उद्योगधंदे भारताकडे आकर्षित व्हावेत हा देखील उद्देश पीएलआय या योजनेमागे आहे. पीएलआयमुळे निर्मिती क्षेत्रातील उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो.