केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवत देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. येत्या एक जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. केंद्राच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत विदेश व्यापार संचलनालयाने सूचना काढून कांद्याच्या निर्यातबंदी धोरणात बदल केला. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीपासून पुन्हा देशातील कांदा निर्यात करता येणार आहे.
कांद्याचे आवाक्याबाहेर जाणारे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने निर्यातबंदीच्या पाठोपाठ कांदा व्यापाऱ्यांवरदेखील निर्बंध घातले होते. १४ सप्टेंबर रोजी केंद्राने कांदा निर्यातबंदी केली होती. तसेच ऑक्टोबरमध्ये व्यापारी व किरकोळ व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा घातली होती. सरकारच्या या कांदा विषयक धोरणांमुळे कृषी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर नाराजी व निषेधही व्यक्त होत होता. कांदा उत्पादकांच्या विविध संघटना, राजकीय संघटना आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर तीन महिन्यांनी केंद्राने निर्यातबंदी उठवली आहे.