शिक्षण बंद झालं म्हणून दिल्लीतील लेडी श्रीराम महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या, मूळ तेलंगणाची रहिवासी असलेल्या एका विद्यार्थीनीनं आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.
तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्याची रहिवासी असलेल्या ऐश्वर्या रेड्डी हिनं दिल्लीच्या लेडी श्रीराम महाविद्यालयापर्यंत आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठ्या कष्टानं पाऊल टाकलं होतं. अतिशय गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या हुशार ऐश्वर्यासाठी ही साधी गोष्ट नव्हती. ऐश्वर्याचे वडील श्रीनिवास रेड्डी हे ऑटो मॅकेनिक म्हणून काम करतात. तर आई घरीच कपडे शिवण्याचं काम करत घराला आर्थिक हातभार लावतात. खूप शिकून, मोठं बनून आयएएस बनण्याचा ध्यास ऐश्वर्यानं घेतला होता. ती अभ्यासात हुशार होती. १२ वी मध्ये तिने ९८.५ % मिळवले होते.
परंतु, करोना संकटानं आणि लॉकडाऊननं तिच्या स्वप्नांना धुळीत मिळवलं. हलाखीच्या परिस्थितीमुळे ऐश्वर्याला लॅपटॉप खरेदी करता आला नाही आणि ती ऑनलाइन अभ्यास करू शकली नाही. त्यामुळे २ नोव्हेंबर रोजी ऐश्वर्यानं आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. ऐश्वर्या ने सुसाईड नोटमध्ये लिहिले कि, ‘माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी माझ्या कुटुंबासाठी एक ओझे आहे. माझे शिक्षण एक ओझे आहे. मी अभ्यास करू शकत नाही, तर मी जगू शकत नाही. ‘
लॉकडाऊनमुळे ऐश्वर्याच्या घरच्या आर्थिक परिस्थितीवर प्रचंड परिणाम झाला. इतकंच काय तर सातवीत शिकणाऱ्या ऐश्वर्याच्या लहान बहिणीला इंटरनेट किंवा इतर साधनं नसल्यानं आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. मदतीसाठी ऐश्वर्याने 14 सप्टेंबर रोजी सोनू सूद यांना पत्र देखील लिहिलं होतं.