उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका वडिलांनी आपल्या तीन वर्षाच्या मुलाला निर्दयपणे मारहाण करून ठार मारले. मुलाचा दोष हा होता की त्याने वडिलांच्या अंथरुणात लघवी केली होती. घटनेनंतर आरोपीने पत्नी आणि आपल्या दोन मुलींना धमकावले की ही गोष्ट कोणाला सांगितली तर संपूर्ण कुटुंबाला ठार मारेल.
हमीरपूर जिल्ह्यातील छनी खुर्द येथे राहणारा संतराम प्रजापती मजूर आहे. त्याचा परिवार पत्नी अनिता, दोन मुली अंजना आणि खुशी आणि एकुलता एक मुलगा रवींद्र (3 वर्षे) असा आहे. घाटमपूरमधील हातरूआ गावाजवळ असलेल्या वीटभट्टीत काम करण्यासाठी संतराम काही दिवसांपूर्वी आला होता. तो कुटुंबासमवेत भट्टीवर असलेल्या एका कच्च्या घरात राहत होता.
आरोपीची पत्नी अनिताने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी मुलगा रवींद्रने वडिलांच्या पलंगावर लघवी केली तेव्हा संतरामची झोप मोडली. तो इतका संतापला की त्याने रंगाच्या भरात मुलाला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. रडण्याचा आवाज ऐकून जवळच झोपलेल्या मुलीही उठल्या. त्या दोघींनी आपल्या भावाला वाचविण्यासाठी वडिलांसमोर हात जोडले. अनितानेही मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण संतरामने त्यांनादेखील मारहाण केली. त्यानंतर संतरामने मुलाला जमिनीवर आपटले आणि मरेपर्यंत मारहाण केली.
मुलाच्या मृत्यूनंतर संतराम पिशवीत मुलाचा मृतदेह घेऊन संपूर्ण कुटुंबाला घेऊन छानी खुर्द गावी गेला. मुलाच्या हत्येची बाब घराबाहेर गेली तर कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. संधी मिळताच पत्नी अनिताने आपला भाऊ अजय याला फोनवर सर्व काही सांगितले. यानंतर भाऊ अजयसह कुटुंबातील इतर सदस्य गावी पोहोचले. आरोपी संतरामला पकडून मारहाण केली आणि या घटनेची माहिती हमीरपूर पोलिसांना दिली. हमीरपूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन संतरामला अटक केली व घाटमपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. संतरामने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जात आहे.