नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये बुधवारी (25 नोव्हेंबर) पहाटे 3.30 वाजता निधन झालं आहे. महिनाभरापूर्वी अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांचे आरोग्य अधिकच ढासळले होते. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते.
फैजल पटेल यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आपणास कळवताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज 25 मे रोजी पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला”. फैजल पटेल यांनी पुढे लिहिले आहे की, “मी आमच्या सर्व शुभचिंतकांना विनंती करतो की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यदर्शनसाठी येताना गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी”.
दरम्यान, अहमद पटेल यांनी 1 ऑक्टोबर रोजी ट्विट करुन त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येण्यापूर्वी काही दिवस आधी ते संसदेच्या पावसाळी आधिवेशनात सहभागी झाले होते.
@ahmedpatel pic.twitter.com/7bboZbQ2A6
— Faisal Patel (@mfaisalpatel) November 24, 2020
अहमद पटेल ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होते. मागील काही वर्षांत काँग्रेसच्या अनेक निर्णयांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. सोनिया गांधी यांच्या कार्यकाळात अहमद पटेल यांचे काँग्रेसच्या राजकारणातले महत्त्व वाढत गेले. अहमद पटेल तीन वेळा लोकसभेचे आणि पाच वेळा राज्यसभेचे खासदार झाले. ते १९७७, १९८० आणि १९८४ मध्ये गुजरातमधून लोकसभेवर निवडून गेले. यानंतर १९९३, १९९९, २००५, २०११ आणि २०१७ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले. गांधी-नेहरु परिवाराचे विश्वासू अशी अहमद पटेल यांची ओळख होती. ते सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते.