पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवारी) पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद या तीन शहरांचा दौरा करुन कोरोनावर मात करण्यासाठी तयार होत असलेल्या लशींच्या संशोधनाचा आढावा घेणार आहेत. पुण्यात सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया, अहमदाबादमध्ये झायडस कॅडिला पार्क आणि हैदराबादमघ्ये भारत बायोटेक कंपनीला भेट देऊन पंतप्रधान लशींच्या संशोधनाचा आढावा घेतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे जातील. अहमदाबाद नंतर पंतप्रधान पुण्यात येतील आणि पुण्यातून ते हैदराबादला रवाना होतील. हैदराबादच्या दौऱ्यानंतर ते दिल्लीला जाणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी सिरम इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील काही महत्वाच्या भागांत पोलिसांनी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. सिरम इन्स्टिट्यूटमध्येही सॅनिटायजेशन व स्वच्छतेविषयीचे सर्व नियम पाळून मोदींच्या दौऱ्याची तयारी करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजता मोदी तेथे दाखल होतील. यानंतर सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांच्यासह शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी ते संवाद साधणार आहेत.