उत्तर प्रदेश : घरी काम करण्यासाठी येण्यास मोलकरणीनं नकार दिला, त्यामुळे एका निवृत्त अधिकाऱ्यानं रागाच्या भरात तिच्या घरी जाऊन तिला धमकावले आणि त्यानंतर तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि हत्या केली. तसंच तिच्या मुलीवरही हल्ला केला, ज्यात ती जखमी झाली आहे. उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या छिदावाला गावात निवृत्त सरकारी अधिकारी सोमपाल सिंह याच्या घरी गावातीलच एक महिला जेवण बनवण्यासाठी व साफसफाई करण्यासाठी येत होती. शनिवारी महिलेने कामावर येण्यास नकार दिला. यावरून चिडलेला सोमपाल सिंह तिच्या घरी गेला. तिला बाहेर खेचत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिच्यासोबत वाद घातला. तसेच तिच्या पतीला आणि मुलीला मारहाण केली. महिलेचे केस आढले. तिने सुटकेचा प्रयत्न केला असता, त्याने तिला गोळ्या घातल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमपाल याने त्याच्या घरी काम करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेची गोळ्या घालून हत्या केली. त्याने तिच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला केला ज्यात ती जखमी झाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.