बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील जवान प्रदीप मांदळे हे कर्तव्यावर असताना काश्मीरमधील द्रास सेक्टरमध्ये गेल्या हिमस्खलनात शहीद झाले. कारगील व द्रास भागातील हवामान खराब असल्याने त्यांचा पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यास उशीर झाला. आज त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का या छोट्याशा गावातील शहीद प्रदीप मांदळे हे महार रेजिमेंटमध्ये 2009 साली सैन्यात भरती झाले होते. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी काही दिवस खाजगी कंपनीतही काम केलं. 2009 मध्ये सैन्यात दाखल झाल्यावर त्यांनी पुणे येथे व नंतर जम्मू काश्मीर मधील वेगवेगळ्या भागात देशसेवा केली.
त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, तीन मुलं व भाऊ आहेत. त्यांची आई आजारी असल्याने औरंगाबादच्या रुग्णालयात भरती आहेत. सध्या ते कारगील मधील द्रास सेक्टरमध्ये कर्तव्यावर होते. मंगळवारी द्रास भागात झालेल्या हिमस्खलनात काही सैनिक गस्तीवर असताना त्याखाली सापडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हवामान खराब असल्याने त्यांचा मृतदेह शोधून मूळगावी आणण्यास उशीर झाला. सकाळी त्यांचं पार्थिव औरंगाबाद येथून सकाळी पळसखेडा चक्काकडे घेऊन निघाले. जिल्हा प्रशासनाने अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण केली आहे.