भारतीयांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे कि, भारतात डिसेंबर अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळेल. देशात सध्या सहा लशींवर काम सुरु आहे. यांपैकी दोन लशींची शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे.
डॉ. गुलेरिया म्हणाले, “भारतात अनेक लशींच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या लशींपैकी कोणत्याही लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. याद्वारे सार्वजनिक लशीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होईल. कोल्ड चेन बनवणे, उपयुक्त स्टोअर वेअरहाऊस उपलब्ध करणे, रणनीती तयार करणे त्याचबरोबर लशीकरण आणि सिरिंजच्या उपलब्धतेसंदर्भात केंद्र आणि राज्यांमध्ये युद्धपातळीवर काम सुरु आहे.”
“लशींची सुरक्षा आणि प्रभावशीलतेशी कदापी तडजोड करण्यात आलेली नाही. ७०,००० ते ८०,००० स्वयंसेवकांना लस देण्यात आल्या आहेत. यांपैकी कोणावरही गंभीर प्रतिकूल परिणाम दिसून आलेला नाही. डेटावरुन लक्षात येतं की, अल्पावधीत लस सुरक्षित आहेत,” असेही यावेळी गुलेरिया यांनी सांगितलं.
डॉ. गुलेरिया पुढे म्हणाले, “सुरुवातीला लस पुरेशा स्वरुपात उपलब्ध होणार नाही. सर्वप्रथम त्या लोकांना लस देऊ, ज्यांचा कोविडमुळे मृत्यू होऊ शकतो. वृद्ध, अन्य आजारांनी पीडित आणि सर्वात पुढच्या फळीत काम करणाऱ्यांना पहिल्यांद्या डोस देण्यात यायला हवा. बुस्टर डोस दिल्यानंतर लस शरिरात चांगल्याप्रकारे अँटिबॉडिज तयार करण्यास सुरुवात करते. अनेक महिने यापासून सुरक्षितता मिळते. तोपर्यंत संक्रमितांची संख्या कमी होऊन जाईल.”