आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असं म्हणत बॉलिवूड मुंबईतच राहिल, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगलं होतं.
कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही. ही काय पर्स आहे का? की ती कुणीही घेऊन निघून जाईल. ही खुली स्पर्धा आहे. सुरक्षा देण्याची, सामाजिक सुरक्षा देण्याची, कुणासोबत भेदभाव न करता चांगलं वातावरण देण्याची गरज आहे, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. मुंबई फिल्मसिटी आपलं काम करेल. यूपीतील नवी फिल्मसिटी त्यांचं काम करेल, असं ते म्हणाले.
बॉलिवूडमधील दिग्गजांचा अनुभव घेऊन त्यांच्या सूचनेनुसार नवं मॉडल तयार करायचं आहे. वर्डक्लास फिल्मसिटी तयार करण्यासाठी फिल्मी दुनियेच्या लोकांशी चर्चा केली. आम्ही कुणाचं काही घेऊन जाणार नाही. आम्हाला नव निर्मिती करायची आहे. त्यासाठी आलो आहोत, असंही त्यांनी सांगितलं. कुणाची गुंतवणूक कुणी घेऊन जाणार नाही. कुणालाही बाधा आणायची नाही. भारताची इकनॉमी वाढवायची आहे. मला वाटतं हेच सर्वांचं लक्ष असलं पाहिजे, असंदेखील ते पुढे म्हणाले.