तिरुवनंतपुरम : केरळमध्ये नुकत्याच महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये तिरुवनंतपुरम महापालिकेत मुडवणमुगल वार्डातून आर्या राजेंद्रन ही 21 वर्षीय तरुणी विजयी झाली आहे. ती तिरुवनंतपुरम महापालिकेची महापौर होणार आहे. आर्याचे वडील इलेक्ट्रिशीयन आहेत, तर, तिची आई एलआयसी एजंट आहे.
आर्या राजेंद्रननं महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर ती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विक्रम मोडणार आहे. देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावावर आहे. वयाच्या 27 व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर झाले होते. तब्बल 23 वर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरील रेकॉर्ड मोडला जाणार आहे.
आर्या राजेंद्रन भारतातील सर्वात तरुण महापौर होणार आहे. ती सध्या ऑल सेंटस कॉलेजमध्ये बीएससी मॅथ्सचे शिक्षण घेत आहे. आर्या राजेंद्रन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणुकीत विजयी झाली असून ती स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची राज्य कार्यकारिणीची सदस्य देखील आहे. आर्या राजेंद्रन सीपीएमची ब्रँच कमिटी सदस्य असून बालाजनसंघम प्रदेशाची अध्यक्ष आहे. केरळमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांच्या लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रंटने विजय मिळवला आहे. केरळमधील स्थानिक निवडणुकांमध्ये 941 ग्रामपंचायत आणि 14 जिल्हा परिषदांमध्ये सत्तारुढ डाव्या आघाडीनं मोठा विजय मिळवला आहे. 10 जिल्हा परिष, 152 पंचायत समित्यांमध्ये सीपीएमच्या नेतृत्वातील एलडीएपला विजय मिळवला आहे. तर भाजपनं 23 ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवला आहे.