केरळ : केरळमधील कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर कन्नूर, वायनाड आणि मलप्पुरम या आणखी 3 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथील 7 ग्रामपंचायती कंटेनमेंट झोन करण्यात आल्या आहेत. कंटेनमेंट झोन भागात आणि रुग्णालयांमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे.
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, कोझिकोड जिल्हा अधिकाऱ्याने 7 पंचायतींमधील सर्व शैक्षणिक संस्था, अंगणवाडी केंद्र, बँका आणि सरकारी संस्था बंद करण्याचे आदेश दिले आहेत. फक्त औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत उघडण्यास परवानगी आहे.
केरळमध्ये आतापर्यंत निपाह व्हायरसचे 4 रुग्ण आढळून आले असून, त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी राज्य सरकारने विधानसभेत सांगितले की, पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) ची टीम आज निपाह व्हायरसची तपासणी करण्यासाठी केरळमध्ये येणार आहे. एनआयव्ही टीम कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये वटवाघळांचे सर्वेक्षणही करणार आहे.
आरोग्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी मंगळवारी रात्री तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये निपाह विषाणूचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रयत्नांबाबत सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, परिसरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू आहे. आरोग्य विभागाने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) शी देखील चर्चा केली आणि राज्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या उपचारांसाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. आरोग्यमंत्र्यांनी स्थानिक आरोग्य कर्मचार्यांना त्यांच्या भागात कडक दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
केरळमध्ये निपाहमुळे पहिला मृत्यू 30 ऑगस्टला झाला आणि दुसरा मृत्यू 11 सप्टेंबरला झाला. आरोग्यमंत्र्यांनी मंगळवारी सांगितले होते की, दोन्ही मृतांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांनी आणखी दोन रुग्ण सापडल्याची पुष्टी केली होती. यामध्ये एका 9 वर्षाच्या मुलाचा आणि एक 24 वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे. दोघांवर उपचार सुरू आहेत.