मुंबई : गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले थिएटर्स अखेर उद्यापासून उघडणार आहेत. नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टिप्लेक्सेस ५० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. मात्र नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टिप्लेक्सेस खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसेल. त्यामुळे थिएटर्स मालक आणि बॉलिवूडकरांना दिलासा मिळाला आहे. उद्यापासून म्हणजेच 5 नोव्हेंबरपासून राज्यातील थिएटर्स उघण्यात येतील. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून देण्यात आलेले सर्व नियम पाळणं बंधनकारक असेल.
बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश या इनडोअर खेळांसह इनडोअर शूटिंग रेंज सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. सॅनिटायझेशनची व्यवस्था आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून खेळाडूंना या ठिकाणी सराव करता येईल. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सरावासाठी जलतरण तलाव सुरू करण्यासही राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. मात्र कंटेन्मेंट झोनमधील जलतरण तलाव बंदच राहतील.
कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असणारी योगा अभ्यास केंद्रं सुरू करण्याची मुभादेखील देण्यात आली आहे. यासाठीची नियमावली सार्वजनिक आरोग्य विभाग जारी करेल. त्यासाठी हा विभाग केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या नियमावलीचा आधार घेईल, असं सरकारनं पत्रकात म्हटलं आहे.