नालासोपारा : नालासोपारा आणि वसई रेल्वे स्थानकाच्या जवळ एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आले आहेत. रेल्वे ट्रॅकवर मालगाडीखाली आल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे तर एक दहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
वसई रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतकांमध्ये ५५ वर्षीय महिला, ३५ वर्षीय मुलगी आणि ३१ वर्षीय मुलाचा समावेश आहे. तर १० वर्षीय मुलगी घटनास्थळी जखमी अवस्थेत आढळून आली आहे. या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
५५ वर्षीय मृतक महिलेच्या पतीने सांगितले की, चारही जण घरातून सकाळी साडे सातच्या सुमारास फिरायला बाहेर पडले होते. माझी तब्येत ठिक नसल्याने मी त्यांच्यासोबत गेलो नाही. त्यांनी मला दोन हजार रुपये दिले होते.
ही घटना नेमकी कशी घडली याबाबत अनेक अंदाज वर्तवण्यात येत आहेत. सामूहिक आत्महत्या आहे की अपघात घडल्याने तिघांचा मृत्यू झाला असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्राथमिकदृष्ट्या हा अपघात असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला आहे. मृतक हे विरार परिसरातील निवासी होते. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.




