राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलेल्या दाव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. राणे नेमकं कोणत्या जयंत पाटलांबद्दल बोलले मला कल्पना नाही,’ अशा शब्दांत सुळे यांनी राणेंच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘आज महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते. जयंत पाटील यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी झाली होती,’ असा दावा नारायण राणे यांनी केला होता. पदवीधर निवडणुकीच्या मतदानासाठी बारामतीतील मतदान केंद्रावर आलेल्या सुप्रिया सुळे यांना या संदर्भात पत्रकारांनी विचारलं. त्यावर त्या म्हणाल्या, ‘राणे नेमकं कोणत्या जयंत पाटलांविषयी बोलले मला माहीत नाही. महाराष्ट्रातील राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. मी स्वत: चार-पाच जयंत पाटलांना ओळखते. ते राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांविषयी बोलले असतील असं वाटत नाही.’
जयंत पाटील अगोदरच राणेंचा दावा फेटाळून लावत म्हणाले कि, ‘मी शरद पवारांचा कार्यकर्ता असल्यानं माझ्या मनाला असा विचार कधी शिवतही नाही. भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांशी माझी चर्चा झाली नव्हती आणि राणे यांची गणती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये होत नाही हे जाणून खेद वाटला. माझी नेमकी कुठल्या नेत्याशी, कुठं चर्चा झाली होती याचा तपशील कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल.’