बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी जवळच्या पांगरी इथल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये दोन महिन्यापूर्वी तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याचे समोर आले आहे. या चोरी प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मागच्या वर्षी बंद होता. त्यानंतर कोरोनोमुळे लॉकडाऊन झाले आणि याच दरम्यान वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये चोरी झाली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात स्टोअर गोडाऊन आणि एक वर्कशॉप गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये 17 ऑक्टोबर 2020 ला चोरी झाली होती. त्याची माहिती स्टोअर कीपर जी.टी. मुंडे यांच्याकडून कारखान्याचे लिपिक आणि लीगल इन्चार्ज यांना कळवण्यात आली. त्यानंतर चोरीच्या ठिकाणाची पाहणी केली असता स्टोअर आणि वर्कशॉपच्या मागील बाजूचं शटर उचकटल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर साखर कारखाना प्रशासनाकडून तपास सुरु होता. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातून जी चोरी झाली त्यामध्ये कारखान्याचे संगणक, कपर मटेरियल, मिल बेअरिंग, बुश साऊंड बार अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. चोरीच्या या घटनेत एकूण 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य लंपास करण्यात आलं आहे. साखर कारखान्यावर 24 तास सुरक्षारक्षक नेमलेले असताना एवढी मोठी चोरी कशी झाली? याचा तपास आता पोलीस करत आहेत.