मुंबई: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे जेव्हा अस्वस्थ असतात तेव्हा पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. शिवाय दगाफटका करण्यात ते माहिर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये केव्हाही राजकीय भूकंप होऊ शकतो, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यात ऑपरेशन लोटसचं पीक येणार नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संजय राऊत म्हणले कि, भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यास नितीशकुमारांना भाजपचं मांडलिक होऊन राहावं लागेल आणि तो त्यांच्या स्वभावाचा भाग नाही. नितीशकुमार अस्वस्थ असतात तेव्हा ते निर्णय घेऊन मोकळे होतात. त्यामुळे बिहारमध्ये कधीही राजकीय भूकंप येऊ शकतो, असं राऊत म्हणाले. नितीशकुमार यांनी माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना दगा दिला. राजद नेते लालूप्रसाद यादव यांनाही दगा दिला होता. एनडीएलाही त्यांनी दगा दिला होता. त्यामुळे ते काय करतील याची काहीही शाश्वती देता येत नाही.
EXCLUSIVE | बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, नितीश कुमार धोका देण्यासाठी प्रसिद्ध : संजय राऊतhttps://t.co/INDBLeSpnx@rautsanjay61 #BiharElection2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 13, 2020
लोजपाचे नेते चिराग पासवान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते अमित शहा यांच्या शब्दाबाहेर असतील असं वाटत नाही. एवढ्या मोठ्या केंद्रीय सत्तेला पासवान यांना आवर घालणं शक्य नव्हतं असं कोण म्हणेल? मोदी-शहांनी मनात आणलं असतं तर पासवान यांचं बंड मोडून काढलं असतं. त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे पासवान यांनी नितीशकुमारांचं 20 जागांवर नुकसान केलं. त्यामुळे नितीशकुमार बिहारमध्ये तिसऱ्या क्रमांकावर गेले, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.