राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालात भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. भाजपला औरंगाबादसह पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला आहे. आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती, पण एकच जागा मिळाली. या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर भाजप नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. परंतु आमच्या स्ट्रॅटेजीत चूक झाली असेल. तसेच तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं. आता आम्हाला त्यांची ताकद समजली आहे. त्यानुसार आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू”.
फडणवीस पुढे म्हणाले की, “ही निवडणूक अचानक लागली, त्यामुळे अनेक ठिकाणी नोंदणी राहिली. आम्ही मतदारांची नोंदणी करण्यात कमी पडलो. माझ्या घरची, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरची चार नावं नाहीत. तरीदेखील जे निवडणूक जिंकले आहेत त्यांना शुभेच्छा. एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटतेय, ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा निवडून आली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना फायदा झाला आहे. या निकालांनंतर जसं आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे, तसंच ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा येत नाही, त्यामुळे त्यांनीही आत्मचिंतन करावं”.