नांदेड : हसण्याच्या कारणावरुन एका फळ विक्रेत्याने तरुणाचे दोन्ही हात छाटल्याची भयंकर घटना समोर आली आहे. नांदेडच्या भाग्यनगर परिसरात बुधवारी दुपारी ही घटना घडली. मोहम्मद अझर मोहम्मद अजीज असं पीडित तरुणाचं नाव असून मोहम्मद तोहीद हा आरोपी फरार आहे. शहरातील डी मार्ट परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज हा तरुण बुधवारी डी मार्ट परिसरातील आठवडी बाजारात लसूण विक्रीसाठी गेला होता. त्याच्याच शेजारी मोहम्मद तोहीद हा तरुण फळ विक्री करत होता. यावेळी हसण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा वाढला की, आरोपी मोहम्मद तोहीद याने बाजारातून कोयता खरेदी केला आणि दुपारी चार वाजेच्या सुमारास मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज याचे मनगटापासून दोन्ही हाथ कोयत्याने छाटले. त्यानंतर त्याच्या पायावर आणि पाठीवर कोयत्याने वार केले. या भयंकर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जखमी तरुणाला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनगटापासून तुटलेले हात जोडण्याचे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. मात्र डॉ. मनीष कत्रुवार, सुशांत चौधरी, डॉ. श्रीहरी गुट्टे यांनी तरुणाच्या हातांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून सहा तासांत दोन्ही हात जोडले.
या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी देखील भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत हात छाटल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.