सोलापूर : वनविभागाला करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात अखेर यश आलं. रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार मारण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात सर्वत्र दहशत पसरली होती.
नगर, बीड, सोलापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात अनेकांचा बळी घेऊन दशहत पसविणारा हा बिबट्या आज सायंकाळी मारला गेला. करमाळा तालुक्यातील वांगी शिवारात पांडुरंग राखुंडे यांच्या केळीच्या बागेत वन विभागाच्या शार्प शूटरने त्याला ठार केले. नगर जिल्ह्यातील पाथर्डी, बीड जिल्ह्यातील आष्टी आणि सोलापूर जिल्ह्याती करमाळा तालुक्यात या बिबट्याचा उपद्रव सुरू होता. या भागात त्याने १२ जणांचे बळी घेतले होते. फक्त करमाळा तालुक्यातच त्याने तीन बळी घेतले होते.
पिंजरे लावूनही तो सापडत नव्हता. माणसांवर आणि प्राण्यांवर त्याचे हल्ले सुरूच होते. त्यामुळे त्याला पकडण्याचा नाहीतर ठार करण्याचा आदेश मुख्य वनसंरक्षकांनी दिला होता. काल सायंकाळी या भागात शेतकऱ्यांना बिबटया दिसल्यानंतर रात्रीपासून त्याला मारण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर वन विभागाच्या शार्प शूटरच्या मदतीने त्याला ठार मारण्यात आले.