बुलडाणा : चोरीच्या गुन्ह्यात बालसुधारगृहात असलेल्या 2 अल्पवयीन मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुलडाणा येथील शासकीय मुलांचे निरीक्षण गृह/बालसुधार गृह आहे. येथे दोन अल्पवयीन गुन्हेगारांनी शनिवारी (6 डिसेंबर) पहाटे 4 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
या दोन अल्पवयीन आरोपींना बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव येथे 10 दिवसांपूर्वी चोरी केल्याच्या गुन्ह्याखाली पकडले होते. त्यानंतर त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. यातील एका मुलाने दोनवेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पुन्हा पकडून बालसुधारगृहात आणलं होतं.
हे मुलं ज्या खोलीत राहत होते, त्या खोलीत त्यांच्याव्यतिरिक्त आणखी एक जण राहत होता. तो झोपेत असताना या दोघांनी टॉवेल आणि बेडशीटला लटकून जीवन संपवलं. तिसऱ्या बालगुन्हेगाराने हा प्रकार पाहताच आरडाओरड केली आणि सर्व कर्मचारी जमा झाले. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.