नागपूर : प्रियकराने टोकाच्या वादातून विवाहित प्रेयसीला जिवंत जाळल्याच्या घटनेनं नागपूरमध्ये खळबळ माजली आहे. ही धक्कादायक घटना अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. आगीत होरपळलेल्या प्रेयसीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शबाना अब्दुल जावेद (वय ४०, रा. महेद्रनगर) असं मृत महिलेचं नाव आहे. शबाना धंतोली आदित्य मोटर्स येथे कार्यरत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्यांचा प्रियकरासोबत वाद झाला. हा वाद टोकाला गेला. रागाच्या भरात प्रियकराने बाटलीतील पेट्रोल शबाना यांच्या अंगावर टाकून शबाना यांना पेटवून देत प्रियकर घटनास्थळावरून त्याच्या दुचाकीवरून निघून गेला. आजूबाजूच्या नागरिकांनी हे दृश्य बघताच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आग विझवून शबाना यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.