शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वशैलीवर भाष्य केलं होतं. राहुल गांधी यांच्याकडे सातत्याचा अभाव असल्याचं मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
“राहुल गांधी आमचे नेते आहेत, त्यांचं नेतृत्व पक्षानं स्विकारलं आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर काँग्रेस पक्ष संघटीत होतो आहे. त्यांनी जिवनात जे दुःख पाहिलं, त्यातूनही सावरत ते नेतृत्व करत आहेत. शरद पवार यांचं ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, परंतू ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं.” असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी आपलं मत मांडलं.
काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकार टिकवायचं असेल तर आघाडीतील नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका-टिपण्णी करणं टाळावं, असा स्पष्ट इशारा काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी दिला होता. यावर काँग्रेसजनांना जे वाटलं ते त्या बोलल्या, असं म्हणत थोरात यांनी त्यांच्या बोलण्याचं समर्थन केलं.