मुंबई : जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळांच्या सन 2022-23 च्या संच मान्यतेनुसार एकूण 59 हजार 997 शाळांपैकी 54 हजार 193 शाळांच्या संच मान्यता झालेल्या आहेत. सन 2022 – 23 च्या आधार आधारित संच मान्यता करण्यात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या 85 टक्के आधार प्रमाणित झालेल्या शाळांच्या संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत. संच मान्यता प्रक्रिया आणि शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली.
राज्यातील विद्यार्थ्यांचे संच मान्यतेच्या प्रक्रियेत आधारकार्ड अद्ययावत करणेबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य अतुल भातखळकर, यामिनी जाधव, राम सातपुते, सुनिल राणे यांनी उपस्थित केला होता.
मंत्री केसरकर म्हणाले, राज्यातील एकूण 2 कोटी 11 लाख 44 हजार 467 विद्यार्थ्यांपैकी 1 कोटी 93 लाख 45 हजार 111 विद्यार्थ्यांचे म्हणजे जवळपास (91.49 टक्के) आधारकार्ड वैध आढळले आहे. उर्वरित 17 लाख 99 हजार 356 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 8 हजार 811 विद्यार्थ्यांनी अद्याप आधार कार्ड क्रमांक घेतलेले नाहीत. त्यापैकी आधार उपलब्ध नसलेल्या खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 26 हजार 773 इतकी आहे. 90 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी संख्या वैध झाल्यानंतर उर्वरित 10 टक्के विद्यार्थी आधार अवैध या कारणास्तव संच मान्यता येत नसल्याने मंजूर पदावर परिणाम होत असल्यास असे विद्यार्थी शाळेत नियमित येत असल्याची गटशिक्षणाधिकारी यांनी खात्री करून 58 हजार विद्यार्थी विचारात घेण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री केसरकर यांनी दिली.