राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना त्यांचे कार्यालय तोडून आणि जाळून टाकण्याचा धमकीचा फोन आला आहे. रुपाली चाकणकर यांचे सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे जनसंपर्क कार्यालय आहे. त्यामुळे चाकणकर यांनी याप्रकरणी तात्काळ सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
एका अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी 5 वाजेच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात फोन करून तुमचे कार्यालय तोडून टाकू, जाळून टाकू, अशी धमकी त्यांना दिली. या धमकीनंतर त्यांच्या कार्यालयात एकच खळबळ उडाली. रुपाली चाकणकर काही कामानिमित्त बाहेर गेलेल्या होत्या.त्यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी झालेला प्रकार चाकणकर यांना फोन करून सांगितला. त्यानंतर चाकणकर यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास असून पोलीस याबाबत तपास करत आहेत, असं चाकणकर म्हणाल्या.