पुणे : मानस तलावात बुडालेल्या कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. भूगाव येथील हॉटेल सरोवरजवळ मानस तलावामध्ये सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची स्कोडा कार अडकून पडली. पोलिसांनी मुळशीस्थित आपत्ती व्यवस्थापन गटाच्या सहकार्याने ही गाडी यशस्वीरित्या बाहेर काढली. दरम्यान, कारमध्ये त्यांना क्रिकेटचा गणवेश घातलेला 40 वर्षीय माणूस आढळला.
रामदास हरिचंद्र पवार (वय ४०, रा. आंबेगाव बुद्रुक) असे या व्यक्तीचे नाव असून ते बुडालेल्या कारच्या मागील सीटवर आढळून आले. त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. ते पिरंगुट येथील उराडे गावातील ब्रिटन कार्पेट उत्पादन कंपनीत इलेक्ट्रिक टेक्निशियन म्हणून काम करत होते. पवार हे विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतील पौड पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पवार यांच्या निधनानंतरच्या परिस्थितीचा तपास सुरू केला आहे. वरिष्ठ निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी तपशील देताना सांगितले की, “स्थानिक रहिवाशांनी मानस तलावात एक तरंगणारी स्कोडा कार (MH 14 CY 0010) बघितली. आमच्या टीमने, प्रमोद बलकवडे यांच्या नेतृत्वाखालील मुळशीस्थित आपत्ती व्यवस्थापन गटाच्या सहकार्याने, यशस्वीरित्या कार बाहेर काढली. कारचे कुलूप आणि खिडक्या तोडल्यानंतर आम्हाला पीडित व्यक्ती मागील सीटवर बेशुद्ध अवस्थेत आढळली. तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
यादव यांनी पुढे सांगितले कि, “आम्हाला कारमध्ये पीडित व्यक्तीचे आधार कार्ड आणि मोबाइल फोन सापडला. फोन अकार्यक्षम असूनही, आम्ही सिम कार्ड काढले आणि संपर्क यादीतील व्यक्तींशी संपर्क साधला. मृत्यू संशयास्पद असल्याने सर्वसमावेशक तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे आणि संभाव्य पुराव्यांसाठी कारची सखोल तपासणी केली जाईल.”