पुणे : एका १३ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये चिखली परिसरात घडली आहे. आईने टीव्ही पाहू दिला नाही म्हणून त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रमजान अब्दुल शेख असं आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही पाहण्यावरुन झालेल्या वादाचा राग मनात धरुन रमजानने मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गळफास घेऊन आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला. परंतू रमजानने गळफास लावल्याचं घरातील व्यक्तींच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने त्याला खाली उतरवलं आणि जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र बुधवारी रात्रीपासून रमजानची प्रकृती सातत्याने खालावत गेली. त्यामुळेच बुधवारी त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला.