पालघर : पालघरमधील घोडीला कॉम्प्लेक्स परिसरातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जेवणात चिकन हवे अशी मागणी केल्यामुळे रागाच्या भरात आईने आपल्या सात वर्षांच्या मुलाला लाटण्याने बेदम मारहाण केली. यात मुलाचा जागीच मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला पतीपासून वेगळी राहत होती. ती आपली दोन मुले आणि दोन बहिणींसोबत घोडीला कॉम्प्लेक्समध्ये राहत होती. दरम्यान, मुलाने जेवणात चिकन मागितल्यामुळे संतापलेल्या आईने त्याच्यावर रागाच्या भरात लाटण्याने वारंवार प्रहार केले. यामध्ये मुलाच्या डोक्यासह शरीरावर गंभीर जखमा झाल्याने त्याची प्रकृती खालावली. मात्र, मुलगा गंभीर जखमी असूनही आईने त्याला दवाखान्यात नेले नाही. त्यामुळे रात्रीच मुलाचा मृत्यू झाला.
स्थानिकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी आईला ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेले लाटणे पोलिसांनी जप्त केले आहे. मृतक मुलाच्या दहा वर्षांच्या बहिणीला या घटनेमुळे मोठा धक्का बसला असून ती खूप घाबरलेली आहे. तिला सुरक्षिततेसाठी आश्रमात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी महिलेने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र, या घटनेमागे काही वेगळी कारणं आहेत का याचा तपाससुरु आहे. याबाबतची खरी माहिती पोस्टमार्टम अहवाल आणि पोलिस तपासानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




