जळगाव : राष्ट्रवादीकडून राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव जवळपास निश्चित केलं आहे. सहकार आणि समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने राष्ट्रवादीने त्यांची निवड केली आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून माझ्या नावाची शिफारस झाल्याचा मला आनंद आहे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसंच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मी आभार मानतो, असं खडसे म्हणाले.
एकनाथ खडसेंसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसकडून गायक आनंद शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, साहित्यिक, प्रा. यशपाल भिंगे यांचीही नावं जवळपास निश्चित झाली आहेत. विधानपरिषदेत राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या जागा रिक्त आहेत. या जागांवर कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता मागील काही दिवसांपासून लागली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून दिली जाणारी प्रस्तावित 12 आमदारांची नावं समोर आली आहेत.




