वर्धा : वर्ध्यातील मुथ्थुट फिनकॉर्प फायनान्स दरोड्याचा पोलिसांनी सहा तासातच छडा लावला. धक्कादायक बाब म्हणजे बँकेचा शाखा व्यवस्थापकच या दरोड्याचा मास्टरमाईंड असल्याचं समोर आलं आहे. यवतमाळच्या करळगाव परिसरातून पाच आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
99 हजार 120 रुपये रोख, 2 किलो 55 ग्रॅम सोनं, दोन चारचाकी असा एकूण 4 कोटी 75 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यासोबत एक पिस्तूल, 6 मोबाईल फोन इत्यादी साहित्यही ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी दिली. मुथ्थुट फिनकॉर्प फायनान्समध्ये काल (17 डिसेंबर) सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास दरोडा पडला. दरोडखोराने कुरियर बॉय असल्याचं सांगत आत प्रवेश केला. त्यानंतर कर्मचाऱ्यांना बंदुकीचा आणि चाकूचा धाक दाखवून तीन लाख रुपये रोख, अंदाजे साडे नऊ किलो सोनं लंपास केलं. कर्मचाऱ्यांना लॉकर रुममध्ये डांबून एका कर्मचाऱ्याची दुचाकी घेऊन पळ काढला.
दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीनंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासात याचा छडा लावला. चोरट्याला बँकेतीलच कोणीतरी माहिती दिली असावी, या दृष्टीने पोलिसांनी तपास केला. त्यानंतर बँकेचा ब्रान्च मॅनेजर महेश श्रीरंगे हाच या दरोड्याचा मास्टरमाईंड असल्याचं पोलीस तपासात उघड झालं. पोलिसांनी यवतमाळच्या करळगाव परिसरातून आरोपींना मुद्देमालासह अटक केली.