मुंबई : टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. याआधीही पोलिसांनी विकास खानचंदानी यांची चौकशी केली होती. आतापर्यंत टीआरपी घोटाळ्यात एकूण 13 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलिसांनी विकास खानचंदानी यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. त्यावेळी मात्र विकास खानचंदानी चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर ते क्राईम ब्रांचसमोर चौकशीसाठी हजर राहिले होते. गेल्या तीन महिन्यांपासून टीआरपी घोटाळ्याचा मुंबई पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक केली आहे.