अहमदनगर : रेखा जरे हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या हत्यांकांडामागील मुख्य सूत्रधार संपादक बाळासाहेब बोठे असून त्याने सुपारी देऊन हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगरसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी त्यांनी या प्रकरणाच्या तपासातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील कारवाईचे तपशीलही दिले. पोलिसांनी आरोपींकडून हत्येच्या सुपारीसाठी दिलेले 6 लाख रुपये जप्त केले आहेत. असं असलं तरी अद्यापही या हत्येमागील कारण स्पष्ट झालेलं नाही. मुख्य सूत्रधार म्हणून पुढे आलेला आरोपी बाळासाहेब बोठे अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याला अटक झाल्यानंतरच या हत्येमागील कारण समजू शकणार आहे.
अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणात सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. यानंतर सुपा पोलीस आणि एमसीबीने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अगरवाल, डीवायएसपी अजित पाटील यांच्या नेतृत्वात तपास करण्यात आला. या पठकाने 2 डिसेंबरपर्यंत 3 आरोपींना अटक केली होती. या 3 आरोपींच्या चौकशीत या हत्येत आणखी आरोपींचा समावेश असल्याचं समोर आलं.
आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या कारवाईत आणखी दोघांना अटक करण्यात आली. सागर भिंगारदिवे आणि ऋषीकेश पवार अशी या आरोपींची नावे आहेत. या 5 आरोपींचा अधिक तपास केला असता या आरोपींना सुपारी दिल्याचं स्पष्ट झालं. बाळासाहेब बोठे यांनी रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी देऊन त्यांची हत्या केली आहे, असं आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालंय, असं मनोज पाटील यांनी सांगितलं.