शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं गोव्यात निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक अशी ओळख असलेले मोहन रावले हे दक्षिण मध्य मुंबईतून पाच वेळा निवडून आले होते. रावले यांना गोव्यात हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
अत्यंत साधी राहणी असणाऱ्या रावले यांचा संपर्क दांडगा होता. मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. रावले हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही काळ अंगरक्षक होते. लालबाग परळ भागातील अतिशय लोकप्रिय माणूस अशी त्यांची ख्याती होती.
संजय राऊत यांनी रावले यांच्या निधनावर प्रतिक्रिया देत म्हटलं कि, “मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्हते. ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहिला. विनम्र श्रद्धांजली…”, असं ट्विट संजय राऊतांनी केलं.
मोहन रावले गेले.
कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते.
“परळ ब्रँड “शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहीला
विनम्र श्रद्धांजली… pic.twitter.com/cnVZzzmIKO— Sanjay Raut (@rautsanjay61) December 19, 2020