पहिला हिंदकेसरी किताब पटकावणारे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील दिग्गज श्रीपती खंचनाळे यांचं निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून खंचनाळे यांची तब्येत बिघडल्यामुळे कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
श्रीपती खंचनाळे मुळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा या भागातले आहेत. १९५९ साली पंजाब केसरी बनता सिंगला धोबीपछाड देत श्रीपती खंचनाळे यांनी हिंदकेसरीची गदा पटकावत कोल्हापूर तसंच महाराष्ट्राचं नाव उज्वल केलं. त्याच वर्षी खंचनाळे यांनी कराड येथे झालेल्या महाराष्ट्र केसरीचंही विजेतेपद पटकावलं होतं. १९५८, १९६२ आणि १९६५ साली झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियनशीप स्पर्धेची विजेतेपदं खंचनाळे यांनी पटकावली होती.
खंचनाळे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. खंचनाळे यांचं पार्थिव कोल्हापुरातील शाहुपुरीत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल.