अमरावती : अमरावतीतील अंजनगाव सूर्जी तालुक्यातील धनेगाव येथील भुयार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकरी अशोक भुयार यांच्या अंत्यसंस्कारावरुन परत येताना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने मोठ्या भावाचा देखील मृत्यू झाला. त्यामुळे एकाच दिवशी दोघा भावांना अखेरचा निरोप देण्याची वेळ भुयार कुटुंबावर ओढवली आहे. देशभरात शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन पेटलं असतानाच अमरावतीतून ही दुःखद बातमी आली.
व्यापाऱ्याने संत्र्याचे पैसे न दिल्याने आणि पोलिसांनीही सहकार्य न केल्याचा आरोप अशोक भुयार यांनी केला होता. व्यापारी आणि पोलिसांनी मारहाण केल्याचा दावाही त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता. अमरावतीतील मोठे नेते बच्चू कडू यांना पत्र लिहून शेतकरी अशोक भुयार यांनी काल विष प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी चिठ्ठीतून भुयार यांनी केली आहे.
भुयार यांच्या आत्महत्येनंतर अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याला गावकऱ्यांनी घेराव घातला होता. आत्महत्या प्रकरणी दोषी असलेल्या पोलिस उपनिरीक्षक दीपक जाधव यांच्यासह संत्रा व्यापारी शेख अमीन आणि शेख गफूर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अशोक भुयार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र लहान भावाच्या मृत्यूचा धक्का संजय भुयार यांना सहन झाला नाही. अंत्यसंस्कारावरुन परत येताना हार्ट अटॅक आल्याने संजय यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.