सोलापूर : बिबट्याच्या हल्ल्यात ऊस तोडणी मजूराच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. सोलापूर मधील करमाळा तालुक्यात ही घटना घडली आहे. बिबट्याला ठार मारण्यासाठी वनविभागाने आदेश दिले होते. त्या ठिकाणी शार्पशूटर दाखल झाले आहेत. परंतु, त्यापूर्वीच बिबट्यानं आठ वर्षीय मुलीचा जीव घेतला आहे.
गावातील एका गावकऱ्याच्या शेतात ऊस तोडणीचं काम सुरु होतं. त्यावेळी आठ वर्षांची मुलगी बाजूला खेळत होती. त्याचवेळी बिबट्यानं या चिमुरडीवर हल्ला केला. गावकरी बिबट्याला मारण्यासाठी धावत आले असता बिबट्यानं तिथून पळ काढला. बिबट्यानं चिमुरडीवर हल्ला केल्यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला होता. या नरभक्षक बिबट्यानं गेल्या चार दिवसांत तीन बळी घेतले आहेत. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याचं आव्हान आता वन विभागासमोर उभं ठाकलं आहे. आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरणं आहे.
यासंदर्भात वनविभागाला माहिती दिल्यानंतर, वनविभागाचं पथक गावात दाखल झालं आहे. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. जवळपास 100 कर्मचाऱ्यांचं पथक करमाळ्यातील या गावात दाखल झालं आहे. या पथकामध्ये शार्पशूटरही आहेत.