महाराष्ट्रात भाजप सत्तांतरासाठी ‘ईडी’चा वापर करून काही सत्ताधारी नेत्यांवर दबाव आणू पाहत आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. त्यानंतर आता संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटमधून भाजपावर नाव न घेता निशाणा साधण्यात आला आहे. या ट्विट केलेल्या व्यंगचित्राला भरपूर लाईक्स मिळाल्याचे दिसत आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापे मारले होते. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात सरनाईक कुटुंब ईडीच्या रडारवर आहे. या कारवाईनंतर शिवसेनेकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे.
ईडी आणि सीबीआय हे केंद्र सरकारच्या हातातील बाहुलं झालं आहे, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे. या व्यंगचित्रात दोन कुत्रे उभे आहेत. त्यातील एका कुत्र्यावर सीबीआय आणि दुसऱ्या कुत्र्यावर ईडी असे लिहिले आहे. “थांब, आता नक्की कोणाच्या घरी जायचं आहे ते अजून ठरलं नाहीये”, असं सीबीआय लिहिलेला कुत्रा ईडी लिहिलेल्या कुत्र्याला सांगताना दिसत आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2020