मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर महाविकास आघाडी सरकारने सुद्धा पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोलाही लगावला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, राज्यात या सरकारने अघोषित आणीबाणी लावली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी म्हटलं, राज्यात कुठेही जनतेमध्ये सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान असल्याचा सूर नाही. पण, विरोधी पक्ष म्हटल्यानंतर त्यांच्या नावात पक्षाच्या आधी विरोधी आहे, त्या शब्दाला त्यांना जागावं लागतं. विरोधक म्हणतात राज्यात अघोषित आणीबाणी आहे. राज्यात अशी अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात काय घोषित आणीबाणी आहे का? कारण ज्या पद्धतीने शेतकरी त्यांच्या न्यायहक्कांसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्यासोबत बोलणं सोडाच पण भर थंडीत त्यांना तिथे रहावं लागत आहे त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात येत आहेत हे मला वाटत नाही की सद्भावनेचे लक्षण आहे.
विरोधकांचं मागचं वर्ष सरकार कधी पडतं आणि सरकार कधी पडणार याचे मुहूर्त काढत बसण्यातच गेलं. त्यामुळे कदाचित त्यांनी सरकारने काय-काय कामं केली हे बघितले नसेल. काही दिवसांपूर्वी याच सभागृहात गेल्या वर्षभरात सरकारने काय काम केले, त्याची पुस्तिका महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवली आहे.
केंद्राकडून जीएसटीचे पैसे येणे बाकी आहेत. केंद्राने वन-नेशन वन-टॅक्सचं ठरवलं होतं ते पाळायचं नाही. महाराष्ट्रावर इतकी नैसर्गिक संकट आली. सरकार सतत अडचणीतून मार्ग काढून पुढे चाललं आहे. मी विरोधकांची आज पत्रकार परिषद पाहिली. त्या पत्रकार परिषदेत अजिबात उत्साह नव्हता, अतिशय चेहरा पडलेला होता. ते सुद्धा डिमॉरलाइज झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद- LIVE https://t.co/cYD2olEMgX
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 13, 2020
महाविकास आघाडी सरकारच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे :
- सरकार पाडण्याचा मुहूर्त काढण्यात विरोधकांचं वर्ष गेलं – मुख्यमंत्री
- देशात घोषित आणीबाणी आहे का? – मुख्यमंत्री
- जनतेमध्ये सरकारविषयी नाराजी नाही – मुख्यमंत्री
- दरेकरांना ताब्यात घेण्याविषयी फडणवीस सुचवतायत का? – मुख्यमंत्री
- आरक्षणाबाबत मराठा नेत्यांशी, विविध संघटनांसोबत चर्चा सुरू – मुख्यमंत्री
- मराठा समाजाच्या न्यायहक्काची लढाई जी आता न्यायालयात चालू आहे ती पूर्ण ताकदीने सरकार लढत आहे – मुख्यमंत्री
- ओबीसी समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न नको – मुख्यमंत्री
- राज्यातला सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करु नये – मुख्यमंत्री
- ओबीसी समाजाच्या हक्काचं जे काही आहे त्यातील एक कण सुद्धा हे सरकार कमी करणार नाही, कमी होऊ देणार नाही. जे काही त्यांच्या न्यायहक्कांचं आहे, ते देण्याबाबत त्यांच्याही विविध संघटनांशी आमची चर्चा होत आहे – मुख्यमंत्री
- अन्नदात्याला देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कृतीत नाही – मुख्यमंत्री
- आपल्या अन्नदात्यावर अन्याय करताना त्याला देशद्रोही ठरवणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. आपल्या न्यायहक्कांसाठी रस्त्यावर येणारा आपला अन्नदाता असेल तर त्याच्याशी नीट बोलण्याऐवजी त्यालाच देशद्रोही, चिनी, पाकिस्तानी म्हणायचं? – मुख्यमंत्री
- पाकिस्तानमधून कांदा आणणारे तुम्हीच, आता पाकिस्तानमधून शेतकरी पण आणायला लागलात? की आपल्याच शेतकऱ्यांना पाकिस्तानचं सर्टिफिकेट द्यायला लागलात? अशा पद्धतीने कारभार आपला देश सहन करणार नाही. न्यायहक्कांसाठी लढायला उतरल्यानंतर त्यांना देशद्रोही ठरवणे हे आणीबाणी पेक्षा जास्त घातक आहे – मुख्यमंत्री
- सरकारचे ८ महिनेत कोरोनात गेले – अजित पवार
- केंद्राकडून जीएसटीचे पैसे येणे बाकी – अजित पवार
- राज्यावर अनेक नैसर्गिक संकटं आली – अजित पवार
- अडचणींवर मार्ग काढत सरकार पुढे चाललं आहे – अजित पवार
- पत्रकार परिषदेत विरोधकांचा चेहरा पडलेला होता – अजित पवार
- कोरोनामुळे सरकारच्या तिजोरीवर भर पडला आहे – अजित पवार