युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी मिळवला. सात कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दल त्यांचा सत्कार आपल्या निवासस्थानी केला. त्यावरून प्रवीण दरेकर यांनी ठाकरेंना टोला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिसले यांना निवासस्थानी बोलावून त्यांचा सत्कार केला. तसेच, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी डिसले यांचा शासकीय निवासस्थानी बोलावून सन्मान केला. याबाबत दरेकर यांनी त्यांच्यावर टीका केली.
प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत म्हटलं कि, “मुख्यमंत्री महोदय, शिक्षणमंत्री महोदया, थोडे कष्ट घेऊन परितेवाडी-बार्शी गाठली असती आणि डिसले गुरुजींचा सत्कार केला असता, तर तो खऱ्या अर्थाने गुरुजींचा, त्यांच्या कुटुंबाचा, शाळेचा, विद्यार्थ्यांचा, त्या परिसराचा सत्कार ठरला असता. जागतिक पातळीवर ज्यांनी राज्याचं नाव रोशन केलं, त्या सत्कारमूर्तीला आपल्या निवासस्थानी बोलावून केलेला सत्कार म्हणजे निव्वळ औपचारिकता ठरली.”