डॉ. विकास आमटे यांच्या कन्या व महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. शीतल यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले, पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
डॉक्टरीसेवा करत असतानाच आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा डॉक्टर शीतल आमटे, सशक्तपणे पुढे चालवत होत्या. ग्रामीण संस्कृतीचे रक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळून तरुणाईचे शहराकडे पलायन थांबवणं, हा ध्यास घेतलेल्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांना आनंदवनला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवायचं होतं. त्याचबरोबर अपंगांसाठी ‘निजबल’, बेरोजगार तरुणांसाठी ‘युवाग्राम’ या प्रकल्पाबरोबरच ‘मियावाकी’ पद्धतीने चार जंगले वसवत पर्यावरण रक्षणाचाही विडा त्यांनी उचलला होता.
डॉ. शीतल यांनी २००३ मध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतलं. सामाजिक उद्यमता (सोशल आंत्रप्रनरशिप) हा अभ्यासक्रम पूर्ण केला. वयाच्या चाळिशीच्या आत केलेल्या कामाबद्दल ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने मार्च २०१६ मध्ये ‘यंग ग्लोबल लीडर’ म्हणून त्यांची निवड केली होती. पुढे अमेरिकेत जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून लीडरशिपचा कोर्सही शीतल यांनी पूर्ण केला होता. मेडिकल लीडरशिप क्षेत्रात ‘लॅन्सेट कमिशन ऑन ग्लोबल सर्जरी’ सोबत ‘मशाल’ आणि ‘चिराग’ असे दोन कार्यक्रम सुरू केले.
शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक चित्रफीत जारी केली होती. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते व आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. ही चित्रफीत नंतर दोन तासांतच माध्यमातून हटवण्यात आली होती. त्यात करण्यात आलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते. डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती.
शीतल आमटे यांनी संस्थेच्या कार्यात मोठे योगदान दिले असले तरी त्यांनी विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांबद्दल जी अनुचित वक्तव्ये केली, ती आधारहीन आहेत. त्यांचे सर्व भाष्य तथ्यहीन आहे. त्यांच्या या आरोपामुळे कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे निवेदन देण्यात येत असल्याचं या चौघांनी म्हटलं होतं.