पुणे : पुणे शहरातील नवले पुलाजवळ आज (२९ नोव्हेंबर २०२०) सव्वासहा वाजता साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या एका टेम्पोचा ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात अनेक वाहने एकमेकांना धडकली. अपघातात एका मोठ्या कंटेनरने पेट घेतला. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याहून मुंबईला एक ट्रक मोकळा जात होता. यावेळी त्या टेम्पोचे ब्रेक फेल झाले. नंतर त्याने पेट घेतला. त्यानंतर त्याने अनेक चारचाकी व दुचाकींना ठाेकरत पुढे गेला. यामुळे पुढे असणाऱ्या गाड्यांनी देखील पेट घेतला. एकामागे एक असणाऱ्या सहा गाड्या एकमेकांवर आदळून हा भीषण अपघात झाला. यामध्ये तीन चारचाकी गाड्याचा अक्षरशः चकणाचूर झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 4 गंभीर जखमी आहेत. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीची आणि इतर जखमींची ओळख अद्याप पटली नाही. घटनेबाबत सिंहगड पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी देविदास घेवारे यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, या भीषण अपघातामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावर काहीवेळ वाहतुक कोंडी झाली होती. वाहतुक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजुला काढून मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अग्निशामक दलाला बोलावून पेटलेला ट्रक विझविला.