सातारा : राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. मात्र, बिचुकले यांचं नावच मतदार यादीतून गायब झालं आहे.
मतदार यादीत नाव नसल्याचं कळताच बिचुकले यांनी मतदान केंद्रावर गोंधळ घातला असून प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. बिचुकले साताऱ्यातील मतदान केंद्रावर गेले असता त्यांना प्रकार लक्षात आला. मतदान यादीत त्यांची पत्नी अलंकृता बिचुकले यांचं नाव होतं मात्र, अभिजीत बिचुकलेंचं नावाच्या जागी नारायण बिचुकले असं दुसरंच नाव होतं. या सगळ्या प्रकारानंतर अभिजीत बिचुकलेंनी हे सगळं षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. उमेदवाराचं नाव यादीत नसेल तर सर्वसामान्यांचं काय. मी कधीही जातीवर राजकारण केलं नाही. यांनी स्वत:ची नावं लिहिली. माझी नोंदणी झाली आहे. बायकोचं नाव आहे. पण माझं नाही. मी उमेदवार आहे. त्यामुळे मला निवडणुकीपासून वंचित राहावं लागणार आहे, असं यावेळी बिचुकलेंनी म्हटलं.