सातारा : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथून सोमवारी एका कामगाराने शोभेच्या चांदीच्या बंदुकीची चोरी केली होती. ती बंदूक साताऱ्यातील एका सोने-चांदीच्या व्यवसायिकाकडे तो विक्रीसाठी घेवून जात असल्याची माहिती सातारा शहर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संजू गुसिंगे यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी कारवाई करत या कामगाराला ताब्यात घेतलं.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन फूट लांब, अंदाजे दीड किलो वजन असलेली चांदीची बंदूक आढळून आली. संशयित व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्याने ही बंदूक उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेस येथून चोरल्याची कबूली पोलिसांना दिली. या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलमंदिर पॅलेस याठिकाणी माळी कामासाठी आलेल्या कामगाराने ही चोरी केल्याची बाब समोर आली. या बंदुकीची अंदाजे किंमत सुमारे 1 लाख रुपये असल्याची माहिती आहे.