पुणे : सौंदर्यासाठी गुलाबाचा वापर भारतात प्राचीन काळापासून प्रचलित आहे. तुम्हाला माहित आहे का की भारतीय गुलाब किंवा रोसा डॅमॅस्केनामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीऑक्सीडेटिव्ह, आरामदायी गुणधर्म आहेत? गुलाबपाणी वापरणे किंवा आपल्या सौंदर्य नित्यक्रमात गुलाबपाणी समाविष्ट केल्याने त्वचा उजळ होण्यास मदत मिळते आणि त्याच्या सुगंधाने आपल्याला ताजेतवाने वाटते.
गुलाबामध्ये निसर्गतः थंडावा देणारा गुणधर्म आहे. तुमच्या त्वचेवर गुलाबपाणी लावणे हा खूप आरामदायी आणि सुखदायक अनुभव असू शकतो, विशेषत: उन्हाळ्यात जेव्हा तापमान वाढत असते. या उन्हाळ्यात तुमच्या त्वचेसाठी आणि शरीरासाठी गुलाबपाणी नक्की वापरा.
गुलाबपाणी वापरण्याची कारणे
शरीराला थंडावा देते
गुलाबपाणी हे शरीराला थंडावा देणारे आहे, म्हणूनच उन्हाळ्यातील अनेक पेयांमध्ये ते समाविष्ट केले जाते. या मोसमात थंड राहण्यासाठी तुम्ही तुमचे गुलाबजल पेय घरीच तयार करू शकता. टरबुजाचे पाणी किंवा तुकडे, गुलाबपाणी आणि गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करा आणि हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा. तुमचे शरीर आतून थंड करण्यासाठी तुम्ही हे क्यूब्स तुमच्या पाण्याच्या ग्लासात टाकून ते पाणी पिऊ शकता.
सुखदायक आणि आरामदायी अनुभव मिळतो
उन्हाळा तुमच्या डोळ्यांसाठी खूप त्रासदायक ठरू शकतो. उष्ण आणि दमट हवामानामुळे तुमच्या डोळ्यांची जळजळ होऊ शकते. जे लोक कॉम्पुटरसमोर बराच वेळ काम करतात त्यांना डोळ्यांची जळजळ आणि डोळे कोरडे पडणे या समस्यांचा सामना करावा लागतो. गुलाबजल थंड आणि आरामदायी असल्याने या समस्येपासून आराम देऊ शकते. तुमच्या डोळ्यांवर थंडगार गुलाब पाण्यात बुडवलेले कापसाचे पॅड ठेवा आणि जळजळ कमी करण्यासाठी आराम करा.
हायड्रेटिंग
गुलाबाच्या पाण्यातील अँटिऑक्सिडेंट आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म त्वचा मजबूत करतात आणि ट्रान्सडर्मल वॉटर लॉस टाळतात, याचा अर्थ ते त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवते. तुम्ही उन्हाळ्यात गुलाबपाणी मिसळून इतर सौंदर्य -उत्पादन वापरू शकता.
त्वचेसाठी उपयुक्त
गुलाबपाणी हा सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त असा सौम्य घटक आहे. गुलाब पाण्याच्या नियमित वापरामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाते आणि ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स आणि मुरुमांसारख्या समस्या दूर होतात. हे त्वचेचा असमान रंग देखील सुधारते आणि ते अधिक उजळ बनवते. आपली त्वचा स्वच्छ करण्यासाठी गुलाबपाण्याच्या वापर केल्याने तेलकटपणा, मेकअप आणि इतर अशुद्धता काढून टाकता येते आणि कालांतराने त्वचा सतेज आणि चमकदार बनते.
गुलाबाचे सरबत बनवण्याची पद्धत :
गुलाबाचे सरबत आपल्याला थंडावा देईल आणि उष्णता कमी करेल. हे गुलाबाचे सरबत पिल्याने शरीरात होणारी जळजळ, तहान नाहीशी होऊन शरीराला थंडावा मिळेल.
साहित्य :
गुलाबपाणी, 1 किलो साखर, 1 चमचा वेलची पूड, 1 चमचा काळीमिरपूड, पाणी, बर्फ.
कृती :
साखरेमध्ये एक ग्लास पाणी घालून त्याला मंद गॅस वर ठेवून साखरेचा पाक तयार करा. पाक एकतारी असाव. नंतर या मध्ये गुलाबपाणी घाला. 4 -5 वेळा उकळी घेऊन गॅस बंद करा. या मध्ये वेलची पूड आणि काळीमिरपूड घालून मिसळा आणि थंड होण्यासाठी ठेवा. हे सरबत थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत भरून ठेवा आणि झाकण लावून ठेवा. जेव्हाही वापरायचे असेल तेव्हा एक ग्लास पाण्यात हे सरबत मिसळा आणि बर्फाचे क्युब्स घालून प्या. आपण यामध्ये गुलाबाच्या ताज्या पाकळ्या वाटून मिसळू शकता.