वॉशिंग्टन : अमेरिकेतील सीरियल किलर सॅम्युअल लिटील याचा मृत्यू झाला. सॅम्युअलने ३5 वर्षात एकूण ९३ महिलांची हत्या केली होती. सॅम्युअल अनेक हत्यांच्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर २०१४ पासून तुरुंगात होता. सॅम्युअल हा मधुमेह तसेच हृदयरोग या आजारांनी त्रस्त असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्याची प्रकृती बरी नसल्यामुळे त्याला कॅलिफोर्नियातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथेच त्याचा मृत्यू झाला.
हत्यांप्रकरणी केलेल्या चौकशीत सुरुवातीला त्याने आरोपांचा इन्कार केला होता. पोलिसांनी अनेकदा त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. जवळपास ७०० तासांच्या चौकशीनंर लिटीलने आपल्या दुष्कृत्यांची कबुली दिली. यामध्ये अनेक हत्या प्रकरणांचा उलगडा झाला. त्याने हत्या केलेल्यांची रेखाचित्रे बनवून त्यांची माहिती पोलिसांना दिली. त्याशिवाय या हत्या कधी केल्या, कोणत्या वर्षी केल्या आणि मृतदेहांची विल्हेवाट कशी लावली याचीही माहिती त्याने पोलिसांनी दिली. सॅम्युअलने १९७० ते २०0५ च्या दरम्यान ९३ जणांची हत्या केली असल्याची कबुली दिली.
या हत्यांचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सॅम्युअलने त्याने केलेल्या हत्यांची सर्व माहिती सांगितली. त्यापैकी त्यांना ६० हत्यांची माहिती योग्य असल्याचे आढळून आले. हत्या केलेले काही मृतदेह कधी सापडलेच नाही. सॅम्युअलने इतर हत्यांबाबत दिलेली माहितीदेखील चुकीची नसणार असेही अधिकाऱ्यांनी म्हटले.
बहुतेक मृत्यू हे ड्रग ओव्हरडोज किंवा अपघात तसेच नैसर्गिक कारणांमुळे झाले, असा निष्कर्ष काढला जायचा. सॅम्युअलने हत्या केलेल्या मृतांमध्ये बहुतांशी शरीर विक्रेय करणाऱ्या आणि अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या महिलांचा समावेश होता.