अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रिटिकचे उमेदवार जो बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले असून त्यांना 264 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत, त्यांना विजयासाठी केवळ 6 मतांची गरज आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असून त्यांना आतापर्यंत 214 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. विजयासाठी उमेदवाराला 270 इलेक्टोरल मतांची गरज आहे. दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टात पोहोचले असल्याची माहिती आहे. आज त्यांनी कोर्टात केस दाखल केली आहे.
जो बाइडन यांना आपल्या विजयाबाबत खात्री असल्याचं दिसत आहे. त्यांनी आज पहाटे साडेपाचच्या सुमारास केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “या प्रक्रियेवर आणि एकमेकांवर विश्वास ठेवा, आपण जिंकू.”
Keep the faith, guys. We’re gonna win this.
— Joe Biden (@JoeBiden) November 4, 2020
मिशिगन आणि पेंसिल्वेनियामधील मतगणनेविरोधात कोर्टात जाण्याच्या निर्णयावर ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, आपल्या वकीलांशी याबाबत चर्चा केली आहे. मात्र ही बाब चांगली नाही. आपली व्यवस्था आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला आधीच खूप नुकसान पोहोचवण्यात आलं आहे, यावर चर्चा झाली पाहिजे, असं ते म्हणाले.
माहितीनुसार, मिशिगनमध्ये आतापर्यंत 96 टक्के मतगणना पूर्ण झाली आहे. इथं बायडन यांना 25,71,602 (49.4%) मतं मिळाली आहेत. तर ट्रम्प यांना 25, 56,469 (49.1%) मत मिळाली आहेत. मिशिगनमध्ये 16 इलेक्टोरल मतं आहेत.