कोरोनावरची लस कधी उपलब्ध होणार याची सामान्यांना उत्सुकता लागली आहे. आता प्रतीक्षा संपली असून लवकरच कोरोनाची लस सर्वसामान्यांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ब्रिटनने Pfizer-BioNTech लसीच्या पुढच्या आठवड्यापासून वापराला मंजुरी दिली आहे.
जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येनं 6.4 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 16 लाखांपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत तर 59 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनावर लस शोधण्याचं काम युध्दपातळीवर केलं जात आहे. अनेक लसी या अंतिम टप्प्यात असून त्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे ब्रिटनने Pfizer-BioNTech लसीच्या वापराला मंजुरी देऊन त्यात बाजी मारली आहे. ही लस आता पुढच्या आठवड्यापासून सर्वसामान्यांना मिळणार आहे.
ब्रिटनमध्ये मंजुरी मिळालेली लस ही 95 टक्के प्रभावी असल्याचं सांगितलं जातं आहे. या लसीचा वापर सर्वप्रथम उच्च प्राथमिकता असलेल्या लोकांवर आणि रुग्णांवर केला जाणार असल्याचं ब्रिटनच्या प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. ब्रिटनने आपल्या 2 कोटी लोकसंख्येसाठी प्रत्येकी दोन डोस असे 4 कोटी डोसची ऑर्डर केली आहे. यातील 1 कोटी डोस येत्या काहीच दिवसात येणार आहेत आणि बाकीचे डोस त्यानंतर येतील अशी माहिती ब्रिटनच्या प्रशासनानं दिली आहे. Pfizer-BioNTech या लसीची साठवणूक -70C या तापमानात करावी लागणार आहे.