चीनचे अवकाशयान चंद्रावर दाखल झाले आहे. चीनच्या सरकारने ही माहिती दिली. ‘चांगए ५’ हे अवकाशयान त्याच्या निर्धारित जागेवर मंगळवारी रात्री ११ वाजता यशस्वीरित्या उतरले, असे चीनच्या राष्ट्रीय अंतराळ प्रशासनाने सांगितले. छायाचित्रे प्रकाशित करण्यात आली असून, त्यांमध्ये हे अवकाशयान जिथे उतरले, तिथली जमीन दिसत आहे.
हेनानच्या दक्षिणी बेटावरून २४ नोव्हेंबरला हे अवकाशयान सोडण्यात आले होते. ते दोन दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर राहून तिथून खडक व मातीचे दोन किलो वजनाचे नमुने गोळा करणार आहे. हे नमुने कक्षेमध्ये पाठवले जातील व तिथून ते ‘रिटर्न कॅप्सूल’च्या माध्यमातून पृथ्वीवर आणले जातील. हे कॅप्सूल या महिन्याच्या मध्याला मंगोलियाच्या गवताळ प्रदेशात उतरण्याची योजना आहे. ही योजना सफर ठरल्यास चंद्रावरील ताजे नमुने पृथ्वीवर आणण्याचा १९७०नंतरचा हा पहिलाच यशस्वी प्रयत्न असेल.
‘चांगए ५’द्वारा आणले जाणारे नमुने अन्य देशांतील संशोधकांना दिले जाण्याची शक्यता आहे. लघुग्रहांसह अन्य ग्रहांवरील नमुने गोळा करण्यावर अनेक अंतराळ मोहिमांद्वारे भर दिला जात असून, हे अवकाशयान चंद्रावर पाठवून चीनने अंतराळ संशोधनात अग्रेसर असलेल्या देशांमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. यापूर्वी ‘नासा’च्या अंतराळवीरांनी अपोलो अंतराळ मोहिमेंतर्गत १९६९ ते १९७२दरम्यान ८४२ पौंड वजनाचे चंद्रावरील नमुने आणले आहेत. त्यापैकी काहींवर अजूनही अभ्यास व प्रयोग सुरू आहेत.
China’s #ChangE5 probe has collected samples from the surface of the moon. This video captures the moment the spacecraft touches down on the moon. #exclusive pic.twitter.com/wp3Sdu1CNc
— China Xinhua News (@XHNews) December 2, 2020