चीन : चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ते ल्युकेमिया या आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. 1989 च्या तियानमेन स्क्वेअर हत्याकांडानंतर चीनचे नेतृत्व करण्यासाठी जियांग झेमिन यांची निवड झाली. त्यांनी सुमारे एक दशक चीनवर राज्य केले. जियांग यांच्या कारकिर्दीत तियानमेन स्क्वेअरच्या निषेधानंतर चीनमध्ये कोणतीही मोठी निदर्शने झाली नाहीत.
चीनच्या विकासात महत्त्वाचे योगदान
जियांग यांचा प्रवास फॅक्टरी इंजिनियर ते जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाचा नेता असा होता. त्यांनी चीनला जागतिक व्यापार, लष्करी आणि राजकीय शक्ती म्हणून उदयास नेले. 1989 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा चीन आर्थिक आधुनिकीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात होता आणि तियानमेन हत्याकांडातून सावरण्याचा प्रयत्न करत होता. परंतु 2003 मध्ये जियांग अध्यक्षपदावरून निवृत्त झाले तोपर्यंत चीन जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य झाला होता, ब्रिटनने हाँगकाँगचा ताबा दिला होता, बीजिंगने 2008 ऑलिम्पिक जिंकले होते आणि देश महासत्ता होण्याच्या मार्गावर होता.